बँकेच्या रांगेमध्ये भेटली 'ती' मला. ह्या इंग्रजांच्या देशामध्ये तसे बाहेरचे सगळेच (गोरे/काळे) लोक अगदी सहज ओळखू येतात. त्यातल्या त्यात परदेशी आले, म्हणजे अगदी युद्ध-भूमी गाजवली असा अविर्भाव आणणरे, स्वतःला अति शहाणे समजणारे विद्यार्थी तर लगेचच टिपता येतात. बेटावर येऊन, नंतर वारं अंगात शिरलेले हि अनेक असतात. बदल, हा व्यक्तीमत्वात होणे गरजेचे आहे बाह्यरूपात नाही हे वाक्यच जणू ह्यांना चुकीचं ठरवायचं असतं. (ह्या post मध्ये मी असे फंडे सांगणार नाही आहे.. !!) सगळेच असे असतात असं नाही, पण अशी लोकं लगेच ओळखू येतात.
असो.. तर ‘ती’ भारतीय होती. पण ह्या वर्गीकरणात बसेल अशी मात्र नव्हती. बावरलेली वाटली. (कदाचित मीही तशीच वाटले असेन तिला, कोणास ठाऊक!) रांगेत उभ राहून वैताग आला होता. Counters, सोफे, खुर्च्या, हसणाऱ्या माणसांनी भरलेली तऱ्हेतऱ्हेची posters असं सगळं एव्हाना दहा वेळा निरखून झाल होतं. आणि मी माझा मोर्चा नेहमीप्रमाणे माणसांकडे वळवलाहि होता. आधीच कुठल्या बँकेमध्ये खात उघडावं याविषयी मनात निर्माण झालेला गोंधळ आणि आता निर्णय झाल्यावर हाती काहीच न येता रांगेत उभं राहणं, प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावरचा वैताग स्पष्ट करत होतं. त्यातून बाहेर पाऊस पडत होता उगाचच ,भुरू-भुरू… अचानक एका हिंदी सिनेमा मधला संवाद आठवला मला. "ये लंडन कि बारीश का कोई भरोसा नही!.." आणि मग काय संपूर्ण सिनेमा एव्हाना डोळ्याच्या पडद्यावर भराभरा सरकू हि लागला होता..
"ये अपने Indians के शूज ऐसेही होते है, Net वाले... पानी तो जाताही है अंदर.. अपने यह कहा waterproof शूज मिलते है?... " माझा सिनेमा खरतर अगदी climax च्या क्षणा पर्यंत आला होता. ह्या Net वाल्या शूज नी तंद्रीच भंगली माझी.. मी मख्खा सारखी हसले फक्त तिच्याकडे बघून.... आणि मग 'ती' बोलायलाच लागली, न थांबता, अखंड...!! मीही नवीनच होते या देशात तिच्यासारखीच आणि एकटीही.. मग काय ऐकायला लागले तिचं बोलणं. नाव, गाव, पत्ता असल्या जुजबी प्रश्नांच्या उत्तरांसाठी तोंड उघडल मी फक्त, बाकी ते बंदच होतं.
तिचा नंबर येईपर्यंत बरच काही समजल मला. तिच्याविषयी, तिच्या कोर्स विषयी, मग तिला तो कोर्स कसा आवडत नाहीये, तो बदलायचाय, मग प्रोफेसर्स कसे आहेत, आज ती लेक्चर बुडवून आल्ये त्यामुळे घाबरल्ये इथपासून ते तिला रूम का बदलायच्ये, ती अंड पण खात नाही, आणि नॉनव्हेज खाणाऱ्या रूम-मेट्स (इथे समदुक्खी वाटले असावे मी तीला!) मुळे तिला कसा वैताग आलाय... इत्यादी सर्व काही. अखेरीस तिचा नंबर आला. ती रूम मधून सर्व कागदपत्र घेऊन बाहेर आली आणि माझा नंबर येईपर्यंत मला अजून काही सल्ले मिळाले.
तू ये पूछले उनसे... मै तो भूल गयी, मेरे पापा ने तो कहा है अच्छा होता है दो accounts हो तो.. अभी वो दुसरी बँक का appointment नही मिल रहा है ना... पर एक महिने बाद हि सही दुसरा account तो होना हि चाहिये.. safety के लिये यार.. ये बँक अच्छा ना लगे, या फिर बँक को कुछ हो गया तो? … पहिला मुद्दा ठीक होता पण दुसरा? खुद्द University नि recommend केलेल्या पहिल्या पाच नावांमधील एक बँक अशी कशी बुडेल? पण MBA Finance करणारी च म्हणणं पटलं बहुतेक मला.. मी चक्क तिच्याबरोबर जाऊन अर्धा तास दुसऱ्या बँकेच्या रांगेत उभं राहून appointment घेऊन आले! एक महिन्यानंतरची!!!
नंतर अशीच भेटली एकदा रस्त्यात अचानक.. मला लांबचा चष्मा आहे हि गोष्टं जरी खरी असली तरी 'ती' डोक्यातून पार निघून गेली होती. ओळखलंच नाही मी तीला, आम्ही अगदी दोन फुट जवळ येई पर्यंत...!! एकतर बर्फात न घसरता, कसरत करत चालण्याचा मला आधीच वैताग आला होता. त्याच्यात Grocery-shopping च्या पाठीवरच्या आणि दोन्ही हातात भरलेल्या पिशव्यातील ओझ्यानी अजूनच डोक्याचं खोबरं झालं होतं. त्यामुळे मी बळच हसलेलं कळलं असावं तीला. माझ्या मनातलं ओळखल्या सारखं ती म्हणाली, I think you didn’t recognise me.. आता मात्र मी तीला पक्कं ओळखलं होतं. It is sooo difficult to walk… Even I am going to do grocery shopping like you. We need to store a lot of food.. (मी तर, ‘आता काहीच खायला उरलं नाही’ म्हणून बाहेर पडले होते.) I heard it is going to be so bad in next few days. मुझे तोह डर लगता है बाबा... हमारे एक professor बोल रहे थे, last year 7 students couldn’t write their papers, because उनके हाथ freeze हो गये थे... and they failed you know..!!! माझ्या हातातील पिशव्या इकडून तिकडे जागा बदलत होत्या आणि कुठे टेकायला मिळतंय का याची वाट बघत होत्या. मलाही वीस एक मिनिटं झाल्यावर आपण फुटपाथ वर उभं राहून येणाऱ्या जाणाऱ्यांची वाट अडवतोय असं उगाचच वाटायला लागलं होतं. खरं म्हणजे फुटपाथ वर इतका बर्फ होता कि तिथून घसरत जावं असं कोणालाही वाटणार नव्हतं. 'ती' मात्र मला तिने भविष्यात होणाऱ्या हिमवर्षावाची चाहूल लागून आणलेले बूट दाखवत होती. ती दोन तीन वेळा कशी पडली, आता बूट आणल्यावर सगळं कसं व्यवस्थित आहे, मग तिच्या मैत्रिणींनी असले बर्फात trecking करण्यासाठी लागणारे शूज कोणी रोज घालतं का म्हणून कसं चिडवलं, आणि तिने ते कसं मनाला लावून घेतलं नाही वगैरे सगळं ती मला सांगत होती. मला मात्र मी माझ्या इंडियातल्या Net वाल्या शूज सकट बर्फात गाडली जाणार कि काय असं वाटायला लागलं होतं. हातातल्या वाण-सामानाने (!!)भरलेल्या पिशव्या, हातमोजे, जाकीट ची बाही असं सगळं बाजूला करून मी घड्याळाकडे कटाक्ष टाकला. तीला म्हणाले, you should go fast… It’s Sunday today. The shop closes at 4..!! पहिल्यांदा इथली दुकाने रवीवारी लवकर बंद होतात याचा आनंद झाला मला..!!
पुन्हा तीन चार महिन्यांनी भेटली एका ट्रीप मध्ये 'ती'. दुसऱ्याच शहरात. आणि एकदम वेगळीच वाटली मला. अजून तीन चार इंडिअन विद्यार्थ्यांच्या ग्रुप मध्ये होती. चक्क hi, how are you doing... एवढ्यावरच बोलणं संपलं आमचं? (म्हणजे तिचं) पण खूपच बदल झाला होता तिच्यात, चांगला बदल.. तो बावचळलेला आणि कायम घाबरलेला चेहरा निघून गेला होता.. आम्हाला ठरलेल्या वेळी, पोहचायच्या ठिकाणी जायला उशीर होत होता. पण तरी बस चुकली तर.. वगैरे असले प्रश्न ह्या वेळी तीला पडले नव्हते. कुठेतरी आत्मविश्वास वाटत होता. उगाचच छान वाटलं मला..
बदल कधीकधी चांगलेही असतात..!!!